हैदराबाद - दिवाळी हा आनंदाचा आणि दिव्यांनी प्रकाशमान होण्याचा सण. घरोघरो मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जाते. गरीबाच्या झोपडीपासून ते गर्भश्रीमंतांच्या घरातही दिवे, लायटींग पाहायला मिळते. दिवाळी फराळ आणि गोडधोड पदार्थांची चव चाखायला मिळते. जुन्या मित्र-मैत्रीणींची मैफील जमत असते. एकंदरीत सगळीकडे उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. मात्र, दिवाळीतील फटाके उडवताना काही अपघात होऊन या सणाला गालबोट लागते. हैदराबादमध्येही फटाके उडवताना अपघात होऊन १० जण जखमी झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय साजरा केलाच जाऊ शकत नाही, अशी धारणा बनली आहे. त्यामुळेच, दिवाळीला फटाके उडवूनच पहिल्या अंघोळीची सुरूवात केली जाते. अभ्यंगस्नानाला, पाडव्याला, भाऊबीजेला फटाके उडवूनच दिवाळी साजरी होते. मात्र, दिवाळीचे फटाके उडवताना काळजी घ्यायला हवी. कारण, एकीकडे ध्वनी आणि वायू प्रदुषणामुळे दिवाळीच्या फटाक्यांवर बंदीची मागणी होत असते. तर दुसरीकडे फटाके उडवताना गंभीर दु:खापत होण्याचीही शक्यता असते. फटाक्यांची दारु उडवताना भडका होऊन अपघातही होत असतात. हैदराबादमध्ये अशाचप्रकारे फटाके उडवताना अपघात होऊन १० जण जखमी झाले असून ४ जण गंभीर आहेत. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी, एका लहान मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे.
येथील एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टर नजाबी बेगम यांनी सांगितले की, आमच्याकडे एकूण १० प्रकरणे आली आहेत, ज्यांना फटाके उडवताना इजा झाली. त्यामध्ये, ४ जणांना गंभीर इजा झाली असून एका लहान मुलाने आपला डोळा गमावला आहे. इतर तिघांवर सर्जरी करण्यात येणार आहे. काल एकाच दिवसांत तिघांनी दवाखान्यात धाव घेतली होती, असेही डॉ. बेगम यांनी सांगितले.