बंगळुरु: कर्नाटकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये काँग्रेस पहिल्या, तर भाजपा दुसऱ्या स्थानावर आहे. निवडणुकीत यश मिळवलेल्या नेत्यांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. तुमकूरमधील अशाच एका मिरवणुकीवर अॅसिड हल्ला झाला आहे. यामध्ये काँग्रेसचे 10 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.तुमकूरमधील काँग्रेस उमेदवार विजयी झाल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढली. त्यावेळी गर्दीतील एका व्यक्तीनं कार्यकर्त्यांवर अॅसिड फेकलं, अशी माहिती तुमकूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. यामुळे काही लोकांना अॅलर्जी झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांवर जे अॅसिड टाकण्यात आलं, ते स्वच्छतागृहात वापरलं जातं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांची प्रकृती सुधारत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:19 PM