आझमगड : उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्हा कारागृहातील 10 कैदी एकाचवेळी एचआयव्ही संक्रमित (HIV Positive) आढळले आहेत. हे सर्व कैदी आझमगड जिल्ह्यातील इटौरा येथील जिल्हा कारागृहात आहेत. ही घटना उघडकीस येताच इतर कैद्यांच्या तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोग्य विभागाने त्याचा अहवाल कारागृह प्रशासन आणि सरकारला दिला आहे. कारागृहातील कैदी एचआयव्ही संक्रमित आढळल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच कारागृह प्रशासन या कैद्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, आझमगड जिल्ह्यातील इटौरा येथे बांधण्यात आलेल्या नवीन हायटेक जेलमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी केली जात आहे. यामाध्यमातून किती कैदी एचआयव्ही बाधित आहेत याची माहिती घेतली जात आहे. सध्या कारागृहात एकूण 2,500 कैदी असून यामध्ये पुरुष आणि महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृहात सुरू असलेल्या एचआयव्ही चाचणी प्रक्रियेत कैदी सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत निम्म्या कैद्यांची चाचणी झाली आहे, ज्यामध्ये एकूण 10 कैदी HIV बाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिला कैद्याबाबत स्पष्ट अहवाल समोर आलेला नाही.
1,322 कैद्यांची झाली तपासणी आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2,500 कैद्यांपैकी एकूण 1,322 कैद्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 10 जण संक्रमित आढळले आहेत. 5 कैद्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर 5 कैद्यांना कन्फर्मेशन चाचणीसाठी दुसऱ्यांदा पाठवण्यात आले आहे. कारागृह प्रशासन त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहे. सध्या कारागृह प्रशासनात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात माजली खळबळ न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात येत असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आय.एन तिवारी यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण 10 कैद्यांची एचआयव्ही पॉझिटिव्ह आली आहे. या कैद्यांना सामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना विषाणूनुसार औषधे दिली जात आहेत. कैद्यांना इतर काही समस्या असल्यास त्यांच्यावर त्यानुसार उपचार केले जातील. एचआयव्हीचे दोन प्रकार आहेत. हे एकतर संक्रमित रक्त संक्रमणाने किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होऊ शकते. अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.