चंदिगड, दि. 28 - 10 वर्षात झालेल्या 200 सुनावणी, त्यातही अनेकदा उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती...या सगळ्या संघर्षानंतर अखेर पंचकुला सीबीआय विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. महिला अनुयायाने गुरमीत राम रहीम याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर गेली 15 वर्ष न्यायालयीन लढा देणा-या पीडित महिलेला न्याय देत न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवलं. सोमवारी न्यायालयाने निकाल सुनावत राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं.
न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर राज्यात उपस्थित असणा-या जवळपास दोन लाख समर्थकांनी हिंसाचार करत जाळपोळ आणि तोडफोड केली. राज्यात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असतानाही समर्थकांनी हिंसाचर केल्याने न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत राजकीय फायद्यासाठी तुम्ही पंचकुला जळू दिलं असं सुनावलं होतं. राज्यात पोलीस, लष्कराचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान आपल्या रंगीबेरंगी कपडे आणि भडक चित्रपटांमुळे आधी चर्चेत आलेला हा गुरमीत राम रहीम आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्याबद्दल अशाच काही 10 महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
1 - कोण आहे गुरमीत राम रहीम ?गुरु राम रहीमचा जन्म 15 ऑगस्ट 1967 रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. नसीब कौर आणि मघार सिंह हे त्याच्या आई-वडिलांचं नाव. गुरु राम रहीम आई - वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आपल्या वडिलांना शेतात मदत करण्यासाठी तो ट्रॅक्टर चालवायचा. हरजीत कौर या महिलेशी त्याचं लग्न झालं असून, त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
2 - हा डेरा सच्चामध्ये कसा पोहोचला ? बलुचिस्तानच्या शाह मस्ताना यांनी 1948 रोजी डेरा सच्चा सौदाची स्थापना केली होता. यानंतर शाह सतनाम यांनी 1948 ते 1960 पर्यंत डेरा सच्चा सौदाचं नेतृत्व केलं. गुरमीत राम रहीमचे वडिल सतनाम यांचे भक्त होते. त्यांनी आपल्या मुलाला डेरा सच्चा सौदाच्या हवाली केलं. 23 सप्टेंबर 1990 रोजी शाह सतनाम यांनी गुरमीत राम रहीम याच्याकडे सर्व सूत्रं सोपवत डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनवलं. त्यावेळी गुरमीत राम रहीम फक्त 23 वर्षांचा होता. त्याने दोन वर्षांपुर्वी 'एमएसजी' नावाने स्वदेशी आणि सेंद्रीय पदार्थांची विक्री सुरु केली. त्याची मुलं हा व्यवसाय सांभाळतात.
3 - जगभरात पसरलेत राम रहीमचे अनुयायी गुरमीत राम रहीमच्या समर्थकांची संख्या खूप मोठी आहे असून जगभरात जवळपास दोन लाख समर्थक आहेत. ट्विटरवर त्याचे 30 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत. श्री श्री रवीशंकर (20 कोटी 26 लाख) आणि योगगुरु बाबा रामदेव (938 हजार) यांचेही इतके फॉलोअर्स नाहीत. फेसबूकवर त्याचे 683,192 फॉलोअर्स असून 673,278 जणांनी त्याचं पेज लाईक केलं आहे.
4 - नुसता बाबा नाही तर रॉकस्टारही गुरमीत राम रहीम नुसता अध्यात्मिक गुरु नसून एक सिंगर, अॅक्टर आणि व्यवसायिकदेखील आहे. त्याने मेसेंजर ऑफ गॉड नावाचा चित्रपटही केला आहे. चित्रपटाचे प्रोमो पाहिले असतील तर भडक कपडे घालून बाईक चालवताना, फायटिंग करताना राम रहीमला दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याने सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणं गायलं आहे. 'लव्ह चार्जर', 'छोरा बब्बर शेर का', 'नेटवर्क तेरे लव्ह का', 'लव्ह रब से', 'थॅक यू फॉर दॅट' हे अल्बमही त्याने रिलीज केले आहेत.
5 - गुरमीत राम रहीमची भव्य लाईफस्टाईलगुरमीत राम रहीम अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखला जात असला तरी त्याचं राहणीमान एखाद्या श्रीमंताला लाजवेल असंच आहे. तो रेंज रोव्हर एसयुव्ही चालवतो. इतकंच नाही तर जेव्हा तो निघतो तेव्हा 100 गाड्यांचा ताफा त्याच्यासोबत असतो. फेसबूकवर त्याने आपली भलीमोठी ओळख सांगितली आहे. अध्यात्मिक गुरु, सिंगर, ऑल राऊंडर खेळाडू, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, लेखर, एडिटर, संगीत दिग्दर्शक, कॉस्ट्यूम डिझायनर, गीतकार, नृत्य दिग्दर्शक अशी भलीमोठी यादी त्याने आपली ओळख म्हणून सांगितली आहे.
6 - गुरमीत राम रहीमला अटक गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं असून 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2002 मध्ये त्याच्या एका अनुयायाने आपल्यावर आणि इतर दोघींवर राम रहीमने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासहित पंजाब आणि हरियाणाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून आपबीती सांगितली होती. न्यायालयाने 2007 मध्ये सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता.
7 - गुरमीत राम रहीमचे समर्थकरॉकस्टार राम रहीम मॉडर्न पद्धतीने अध्यात्म शिकवतो. तशीच त्याची ओळख आहे. 'नाम चर्चा', आणि 'रुबरु नाईट्स' मधून राम रहीम भक्तांना अध्यात्म शिकवत असतो. यावर्षी त्याच्या वाढदिवसाला 125 समर्थकांनी एकाच वेळी केकवर दीड लाख मेणबत्त्या पेटवल्या होत्या
8 - गुरमीत राम रहीमचा राजकीय नेत्यावरील प्रभावव्हीव्हीआयपी दर्जा आणि झेड लेव्हल सुरक्षा मिळणा-या देशभरातील 36 जणांमधील एक नाव गुरमीत राम रहीमचं आहे. हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील राजकीय नेत्यांमध्ये राम रहीमचा प्रचंड प्रभाव असून त्याचे अनुयायी आहे. त्याच्या संस्थेने 2015 बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला समर्थन दिलं होतं. जवळपास 300 समर्थकांनी भाजपासाठी प्रचारही केला होता.
9 - राम रहीमचं सामाजिक कार्यराम रहीमचे समर्थक सामाजिक कार्यासाठी त्याचं कौतुक करत असतात. गुजरात भूंकपावेळी मदतकार्य करण्यापासून ते सर्वात मोठं रक्तदान शिबीर आयोजित करण्याचं काम राम रहीमने केलं आहे. डेरा सच्चाच्या समर्थकांनी डिसेंबर 2003 मध्ये सर्वात मोठं रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा रेकॉर्ड केला आहे. या शिबीरात 15 हजार डोनर सहभागी झाले होते.
10 - राम रहीमच्या नावे 53 वर्ल्ड रेकॉर्डयुकेमधील वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीने राम रहीमला डॉक्टरेट डिग्री दिली आहे. राम रहीमच्या नावे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये 53 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. यामधील 17 गिनीज रेकॉर्ड, 27 एशिया बूक रेकॉर्ड, सात इंडिया बूक रेकॉर्ड आणि दोन लिमका बूक रेकॉर्ड आहेत.