नवी दिल्ली : आयटी आणि दूरसंचार क्षेत्रातील बड्या १0 कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात करणार आहेत. २00८ ते १0 या काळातील मंदीनंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात नोकर कपात केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार, मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील व्यावसायिकांना नोकर कपातीचा पहिला फटका बसणार आहे. त्यानंतर पुढच्या काही महिन्यांत कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची कुऱ्हाड कोसळेल.कॉग्निझंट-कॉग्निझंट किमान ६ हजार कर्मचारी काढणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हा आकडा २.३ टक्के आहे. स्वयंचलितीकरणामुळे निरर्थक झालेली पदे रद्दच केली जाणार आहेत. याशिवाय कंपनीने स्वेच्छा पदत्याग योजनाही आणली आहे. कॅपजेमिनी-फ्रेंच आयटी कंपनी कॅपजेमिनी ९ हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठविणार आहे. एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ५ टक्के आहे. कॅपजेमिनीने २0१५ मध्ये अधिग्रहण केलेल्या आयगेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीने मुंबईतील ३५ उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष, संचालक आणि वरिष्ठ संचालकांना राजीनामे देण्यास सांगितले होते.इन्फोसिस-इन्फोसिस आपल्या १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहे. लेव्हल-६ आणि त्यावरील गटातील हे कर्मचारी आहेत. समूह प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ आर्किटेक्ट आणि त्यावरील पदांचा यात समावेश आहे.विप्रो : सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी विप्रो अतिरिक्त असलेल्या व्यवस्थापक आणि कार्यकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना घरी पाठविणार आहे. सीईओ आबिदाली निकुचवाला यांच्या धोरणानुसार कंपनी अधिक सुटसुटीत आणि विकेंद्रित केली जाणार आहे.एअरसेल : दूरसंचार क्षेत्रातील कंपनी एअरसेल १0 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. ८ हजार पैकी ७00 कर्मचाऱ्यांना कंपनी काढणार आहे.स्नॅपडील : ई-टेलर कंपनी स्नॅपडील तब्बल ३0 टक्के कर्मचारी कमी करणार आहे. सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसेल.टाटा टेलिसर्व्हिसेस -सुमारे ५00 ते ६00 जणांना कामावरून कमी करणार आहे. विक्री आणि अन्य कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर ही कुऱ्हाड कोसळणार आहे. राहिलेल्या सेवेसाठी वार्षिक १ महिन्याचे वेतन देऊन त्यांना काढले जाणार आहे.लिएको-चिनी कंपनी ‘लीएको’ने भारतातील ८५ टक्के कर्मचारी वर्ग काढून टाकला आहे. दोन सर्वोच्च अधिकारीही काढले आहेत. कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.क्राफ्टस्विला-अॅथनिक आॅनलाइन रिटेलर क्राफ्टस्विला कंपनीने अलीकडेच १00 लोकांना कामावरून काढले आहे. आणखी लोकांना काढले जाणार आहे.येपमी-फॅशन क्षेत्रातील स्टार्ट अप येपमीने अलीकडच्या काही आठवड्यांत अनेक कर्मचाऱ्यांना ले-आॅफच्या पिंक स्लिप दिल्या आहेत.
10 आयटी, दूरसंचार कंपन्या करणार नोकर कपात!
By admin | Published: May 11, 2017 1:05 AM