ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - राजधानी दिल्लीतील द्वारका परिसरात बीएसएफचे (सीमा सुरक्षा दल) चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात २ वैमानिकांसह विमानातील १० जण ठार झाले आहेत. रांचीला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावरून आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही मिनिटांतच ते खाली कोसळले.
यावेळी विमानात २ वैमानिक व ८ अभियंते असे १० प्रवासी होते. अपघातानंतर विमानाला आग लागल्याने ते जळून पूर्णपणे खाक झाले असून विमानातील सर्व जण मृत्यूमुखी पडले. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हे घटनास्थळी तातडीने रवाना झाले असून केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री महेश वर्मा यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.