नवी दिल्ली : चीनच्या कुरापती दिवसेंदिवस समोर येत आहेत. दरम्यान, सीसीटीव्हीच्या रूपात चीनचेभारतात जवपास 10 लाख हेर आहेत. त्याद्वारे चीन देशातील सर्व हालचालींवर नजर ठेवत आहेत. चीनच्या या दृष्टिकोनावर केंद्र सरकारचे आयटी मंत्रालय लक्ष ठेवून आहे. बीजिंग 'मेड इन चायना' सीसीटीव्हीद्वारेभारताच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
एका अंदाजानुसार, देशात 10 लाख सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, जे सायबर सुरक्षेसाठी मोठा धोका आहे. स्वस्त असल्याने भारतात चिनी सीसीटीव्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात, मात्र केंद्रीय यंत्रणांनी आता या प्रकरणी सावधगिरी बाळगली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी केवळ चीनकडून संभाव्य हेरगिरी लक्षात घेऊन त्यांच्या देशात बनवलेल्या सीसीटीव्हींवर कडक कारवाई केली आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील काँग्रेस आमदार निनोंग इरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोक्याची भीती दाखवत देशात चीन निर्मित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. पासीघाट पश्चिम येथील आमदार निनोंग इरिंग यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात लोकांमध्ये आपल्या घरात चिनी सीसीटीव्ही कॅमेरे न वापरण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची सूचना केली.
गरजेनुसार सीसीटीव्ही डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी स्वदेशी क्लाउड-आधारित सर्व्हर सुरू करण्याचा विचार सरकार करू शकते, असे निनोंग इरिंग यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "आयटी क्षेत्रातील भारताचा पराक्रम पाहता, आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या या धोक्याचा सामना करण्यास सक्षम आहोत." दरम्यान, एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत निनोंग इरिंग म्हणाले की, देशात वापरण्यात येणारे चिनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बीजिंगमध्ये 'डोळे आणि कान' म्हणून वापरले जाऊ शकतात.