ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदीच्या 50 दिवसांत बँकांमध्ये 500 आणि 1000च्या जुन्या नोटांच्या स्वरूपात 10 लाख कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम म्हणजे बाजारातील रकमेच्या तुलनेत सुमारे दोन-तृतीयांश इतकी आहे. 10 लाख कोटी एवढी रक्कम जवळपास 1 कोटी बँक खात्यांमध्ये जमा केली गेली आहे. बँकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्यानं प्राप्तिकर विभागही गोंधळून गेला आहे. नोटाबंदीनंतर हे पैसे कॉर्पोरेट बँक, फायनान्स कंपन्या, व्यवसाय आणि सरकारी विभाग आणि इतर संस्थांमध्ये जमा करण्यात आले आहेत. यानंतर आता बँकांमध्ये जमा होणा-या संशयास्पद काळ्या पैशाला ओळखणं सोपं जाणार आहे. प्राप्तिकर विभागाकडून चौकशीत संशयित आढळलेल्या जवळपास 18 लाख बँक खातेधारकांना ईमेल आणि एसएमएस पाठवण्यात आले आहेत. या बँकांच्या खात्यांमध्ये 5 लाखांहून अधिकची रक्कम जमा झाली असून, ती 4.2 लाख कोटींच्या घरात आहे. या सर्व प्रकरणावर डेटा एनालिटिक्स काम करत असून, बँक खाते आणि रोख रकमेतून कर्जाचा भरणा करणा-यांची अधिक तपशीलवार माहिती समोर येणार आहे. आम्ही 18-24 महिन्यांमधील बँकेच्या तपशीलाचा विस्तृत अभ्यास करून काळा पैसा धारकांना पकडू, मात्र प्रामाणिक लोकांना याचा त्रास होणार नाही, याचीही विशेष काळजी घेऊ, असं महसूल विभागाच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. सरकार जास्त स्वरूपात बँकेत पैसा जमा करणा-यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काळा पैशा धारकांनी डिस्क्लोजर स्कीमचा फायदा घेऊ शकेल, असा उद्देश सरकारचा असल्याची माहिती या अधिका-यानं दिली आहे. 80 लाखांहून अधिक रक्कम जवळपास 1.4 लाख बँक खात्यात जमा झाली असून, प्रत्येक खात्यात 3.31 कोटी रुपये जमा झालेत. त्यामुळे गरिबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
नोटाबंदीनंतर 50 दिवसांत बँकेत जमा झाले 10 लाख कोटी
By admin | Published: February 05, 2017 9:13 AM