छत्तीसगड: बिजापूर जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले. येथील पुजारी कांकेर परिसरात ही चकमक झाली. यावेळी भारतीय जवानांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती विशेष पोलीस उपमहासंचालक डी.एम. अवस्थी यांनी दिली. तेलंगणा आणि छत्तीसगढ पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या चकमकीदरम्यान ग्रे हाऊंडस पथकातील सुशील कुमार हा जवान गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना 50 ते 60 नक्षलवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये 12 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित नक्षलवादी पळून गेले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दामोदर आणि लक्ष्मणन या दोघांचाही समावेश आहे. दामोदर उत्तर तेलंगण स्पेशल झोनचा प्रमुख होता.
गेल्याच आठवड्यात सुकमा येथे सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी 08 कोब्रा बटालियनचे कमांडो प्रकाश चंद यांनी अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले होते. या चकमकीदरम्यान त्यांच्या पायात एक गोळी लागली. मात्र, त्यांनी हार न मानता आठ किमी अंतर चालत पार करून रुग्णालय गाठले होते. तत्पूर्वी 18 फेब्रुवारीला सुकमा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल पाच तासांची चकमक झाली होती. पोलिसांनी चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार केलं होतं. यावेळी एसटीएप आणि डीआरजीचे दोन जवानही शहीद झाले होते. सविस्तर वृत्त लवकरच...