नवी दिल्ली - देश कोरोनाचा संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. विषारी दारूने तब्बल 10 जणांचा बळी घेतला असून 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरेना जिल्ह्यातील बागचीनी पोलीस ठाणे क्षेत्रातील मानपूर गाव आणि सुमावली येथील पहवाली गावातील लोक विषारी दारू प्यायल्याने आजारी पडले आहेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काहींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्वालियरला हलवण्यात आलं आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशच्या उज्जैन (Ujjain) मध्ये एक अत्यंत भयंकर घटना समोर आली असून एकच खळबळ उडाली होती. विषारी दारुमुळे (Poisonous Liquor) 14 जणांचा मृत्यू झाला होता. अवैध दारूविरोधात कारवाईत 10 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच या घटनेनंतर खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रकरणी एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त उज्जैन नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
पंजाबमध्ये विषारी दारूमुळे 86 जणांचा मृत्यू; 25 जणांना अटक
पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिऊन दगावलेल्या लोकांची संख्या आता 86 च्या वर गेली होती. तसेच याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली होती. तर 13 अधिकाऱ्यांसह दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित करण्यात आले होते. 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबास दोन लाख रुपयांच्या मदतीची ही घोषणा केली होती.