म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून १० जण जागीच दगावले आहेत. म्हैसूरजवळील केटी नरसिंहपुरा येथे इनोव्हा आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा कारमध्ये २ मुलांसह ११ जण होते. ही धडक एवढी भीषण होती की, इनोव्हा कारचे पूर्णपणे नुकसान झाले.
याआधी कोपल्ल येथे भीषण अपघातयाआधी रविवारी संध्याकाळी कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील कुश्तगी तालुक्यात कार आणि लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली. यामध्ये दोन मुले आणि एका महिलेसह ६ जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत विजयपुरा येथील रहिवासी असून ते कारमधून बंगळुरूला जात होते, तर लॉरी तामिळनाडूहून गुजरातकडे जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, समोरासमोर झालेल्या धडकेत संपूर्ण कार लॉरीच्या पुढच्या भागावर जाऊन आदळली. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात यश आले. सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली.