मंदसौर: देशातील कोरोना संकट नियंत्रणात आलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र यामुळे अनेकजण लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. आता कोरोना संपला अशा आविर्भावात अनेकजण वावरत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी विविध ऑफर दिल्या जात आहेत.
मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दारुवर १० टक्के सवलत मिळत आहे. शहरातील तीन दुकानांनी बुधवारपासून सवलत देण्यास सुरुवात केली आहे. मंदसौरचे जिल्हा अबकारी अधिकाऱ्यांनी काल याबद्दलची माहिती दिली. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ग्राहकांनी प्रमाणपत्र दाखवल्यानंतर त्यांना दारूवर १० टक्के सूट मिळेल, अशी माहिती जिल्हा अबकारी अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील तीन दुकानांनी ही सवलत सुरू केली आहे.
मध्य प्रदेश सरकार लसीकरण मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप एकही डोस न घेतलेल्यांचं प्रमाणदेखील लक्षणीय आहे. लोकांनी लस टोचून घ्यावी यासाठी विविध प्रकारचे पर्याय वापरले जात आहेत. मंदसौरच्या अबकारी विभागानं दारुवर सवलत देण्याचा पर्याय स्वीकारला आहे. दारुवर सूट मिळत असल्यानं मद्यप्रेमी लसीकरण करून घेतील, असं अबकारी विभागातील अधिकाऱ्यांना वाटतं.