ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. २९ - सर्व अनारक्षित जातींमधील आर्थिक दृष्टया मागासवर्गासाठी गुजरात सरकारने शुक्रवारी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. सरकारी नोक-या आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. आरक्षणाची अधिसूचना एक मे रोजी काढणार असून, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी आहे ते सर्व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
मागच्या काही महिन्यांपासून ओबीसी कोटयातंर्गत आरक्षणासाठी आंदोलन करणा-या पाटीदार समाजाला या आरक्षणाचा फायदा होणार आहे. एससी, एसटी आणि ओबीसीसाठी जे ४९ टक्के आरक्षण आहे त्याला हात न लावता नवीन कोटयाची तरतुद केली जाईल.
पाटीदार पटेल हा गुजरातमधील प्रमुख समाज असून, भाजपचा मुख्य समर्थक मानला जातो. पाटीदार, ब्राम्हण, क्षत्रिय आणि लोहाना या सर्व समाजांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ओबीसी कोर्टयातंर्गत आरक्षण मिळावे यासाठी गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाची सातत्याने आंदोलने सुरु आहेत. हार्दिक पटेल या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. मागच्यावर्षी गुजरातमधील अनेक शहरांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागून मोठया प्रमाणावर जाळपोळ, हिंसाचार झाला होता.