मदुराई : सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांचा दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.येथील एका सभेत मोदी म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून तामिळनाडूतील काही जण स्वत:च्या स्वार्थासाठी संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत. समाजातील सर्व वर्गांतील लोकांना शिक्षणाची संधी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी १० टक्के राखीव जागांचा निर्णय घेण्यात आला. तामिळनाडूतील द्रमुक व अन्य काही पक्षांनी १० टक्के राखीव जागांच्या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सामाजिक मागासलेपण हा राखीव जागांसाठी एकमात्र निकष असावा, अशी मागणी या पक्षांनी केली आहे.ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. आर्थिक घोटाळे करणारे भलेही विदेशात लपून बसले असतील, त्यांना तेथून जेरबंद करून भारतात आणू. तामिळनाडू येथील तोप्पूर येथे बांधण्यात येणाऱ्या एम्स रुग्णालय प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात ते म्हणाले की, सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्मान योजना राबविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)एमडीएमकेची निदर्शनेकावेरी व अन्य प्रश्नांवरून मोदी यांनी तामिळनाडूची फसवणूक केल्याचा आरोप करीत त्यांना एमडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदुराई येथे काळे झेंडे दाखविले. या पक्षाचे प्रमुख वायको यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या न्यूट्रिनो व हायड्रोकार्बन प्रकल्पांमुळे तामिळनाडूतील शेतकºयांची रोजीरोटीच जाणार आहे. कावेरी प्रश्नी मोदी सरकार कर्नाटकच्या फायद्याची भूमिका घेत आहे, असाही आरोप त्यांनी केला.
१० टक्के राखीव जागांमुळे सध्याच्या आरक्षणावर परिणाम नाही - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 4:43 AM