कर्नाटकात १० बंडखोरांना मंत्रीपदे; भाजपाचे तीन जण कमालीचे नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 05:39 AM2020-02-07T05:39:53+5:302020-02-07T05:39:56+5:30
काँग्रेस-जनता दलाचे (एस) आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यावर ते अपात्र ठरले गे
बंगळुरू : काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचे सरकार खाली खेचण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या दहा बंडखोरांना मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी गुरुवारी कॅबिनेट मंत्रीपदे दिली. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मूळ भाजपच्या नेत्यांमध्ये असमाधान निर्माण झाले आहे. पक्षश्रेष्ठींकडे पक्षातील जुने अनेक जण मंत्रीपदासाठी प्रयत्न करीत असताना पक्षनेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
काँग्रेस-जनता दलाचे (एस) आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यावर ते अपात्र ठरले गेले. नंतर या आमदारांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेली विधानसभा पोटनिवडणूकही जिंकली. राजभवनवर साध्या समारंभात या आमदारांना राज्यपाल वजूभाई वाला यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. या नव्या मंत्र्यांची नावे अशी- एस.टी. सोमशेखर (यशवंतपूर मतदारसंघ), रमेश जारकिहोली (गोकाक), आनंद सिंह (विजयनगर), के. सुधाकर (चिक्कबल्लापूर), बी. बसवराज (के.आर. पुरम), ए. शिवाराम हेब्बर (येल्लापूर), बी.सी. पाटील (हिरेकेरूर), के. गोपालय्य (महालक्ष्मी लेआऊट), के.सी. नारायण गौडा (के.आर. पेट) आणि श्रीमंत बाळासाहेब पाटील (केगवाड).
बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तारामुळे मंत्रिमंडळात २८ मंत्री झाले आहेत व सहा जागा रिक्त आहेत. येदियुरप्पा यांनी रविवारी गुरुवारी शपथ घेतलेल्या १० जणांसह एकूण १३ इच्छुकांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे जाहीर केले होते. तीन जण भाजपचे आहेत. उमेश कट्टी, अरविंद लिंबावली आणि सी.पी. योगेश्वर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. भाजपमधील एका गटाने योगेश्वर यांना ते विधानसभेची निवडणूक हरले असून, विधिमंडळाचे सदस्य नाहीत, असे सांगून मंत्री बनवण्यास विरोध केला होता.