नवी दिल्ली : मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलवाहतूक योजनेमध्ये महाराष्ट्रातील दहा नद्यांची निवड झाली असून, पुढील दीड वर्षांत यामधून मधून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी स्वयंचलित नौका वापरण्याचा विचार आहे. नदीच्या दोन्ही बाजूंचा विकास यातून साध्य होईल असा विश्वास सरकारला आहे.मुंबईच्या रहदारीचा अंदाज घेऊन कल्याण- ठाणे- मुंबई हा मार्ग जलवाहतुकीने जोडण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून स्वस्त जलवाहतुकीला वेग देण्यासाठी मंत्रालयाने पढाकार घेतला असून, देशातील १०१ नद्यांची निवड केल्यावर त्यात महाराष्ट्रातील १० व गोव्यातील सहा नद्यांचा समावेश करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्याचे परिवहनमंत्री नितीन गडकरी म्हणाले. गडकरींनी या प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले, नागपूरची नाग, रत्नागिरीतील अंबा, यवतमाळातील अरूणावती, बुलडाण्यातील पैनगंगा, बीडमधील मांजरा, महाडची सावित्री, संगमनेरची शास्त्री, ठाणे जिल्ह्यात रेल्वेला समांतर जाणारी उल्हास, महाबळेश्वरला उगम पावणारी कृष्णा, चंद्रपूरची वैनगंगा या नद्यांमधून जलवाहतूक होणार आहे. तर गोव्यातील जुआरी, सल, म्हापसा, मांडवी, कुमबरजुआ, चापोरा या नद्यांमधून जलवाहतूक करून तेथील पर्यटनाला गती देण्याचाही विचार सरकारचा आहे. बीडच्या मांजरा व महाबळेश्वरच्या कृष्णेच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण या राज्यांनाही जलवाहतुकीने जोडण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळाल्याने एकत्रित विधेयक आणून जलवाहतूक सुरू केली जाईल. देशात १२०८ बेटे व १८९ दीपस्तंभ असून त्यांचा विकास करून ती पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)च्छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या यशाची गाथा प्रेरणादायी असल्याने त्यांच्या नावाने रत्नागिरीजवळ एक बंदराचा विकास करण्यात येणार आहे. च्रस्ते व रेल्वेने जोडून देशातील १२ मोठ्या बंदरांचा विकास ‘रेल्वे विकास कार्पोरेशन’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचाही यामध्ये समावेश आहे.
जलवाहतुकीत महाराष्ट्रातील १० नद्या
By admin | Published: March 27, 2015 1:37 AM