10 रुपयांच्या नोटेचा हव्यास भोवला, व्यापाऱ्याचे 10 लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 06:09 PM2019-07-11T18:09:44+5:302019-07-11T18:19:52+5:30
अभिषेक हे व्यापारी महेश चंद यांचे ड्रायव्हर आहेत. मंगळवारी महेश चंद हे ड्रायव्हर अभिषेकला घेऊन राजेंद्र नगर येथील एका बँकेत आले होते.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजेंद्र नगर परिसरात एका व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरला 10 रुपयांच्या नोटा उचलले चांगलेच महागात पडले आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या काही चोरट्यांनी 10 रुपयांच्या नोटांचे आमिष दाखवून तब्बल 10 लाख रुपयांची लूट केली आहे. गाडीच्या मागील सीटवर असलेली बॅग उचलून चोरट्यांनी पोबारा केला. या बॅगेत गाडीमालकाचा मोबाईल व अन्य महत्त्वाच्या वस्तूही होत्या. याप्रकरणी व्यापारी महेश चंद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अभिषेक हे व्यापारी महेश चंद यांचे ड्रायव्हर आहेत. मंगळवारी महेश चंद हे ड्रायव्हर अभिषेकला घेऊन राजेंद्र नगर येथील एका बँकेत आले होते. त्यावेळी, महेश बँकेत गेले अन् अभिषेक यांस गाडीतच बसण्यात सांगितले. गाडीच्या मागील सीटवर महेश यांनी आपली बॅगही तिथेच सोडली होती. त्याचवेळी, एका युवकाने गाडीच्या काचेवर आवाज देत अभिषेकचे लक्ष वेधले. अभिषेकनेही गाडीची काच खाली करुन त्या युवकाकडे पाहिले. त्यावेळी, युवकाने रस्त्यावर खाली आपले पैसे पडल्याचे अभिषेक यांस सांगितले. अभिषेकही रस्त्यावरील 10-10 रुपयांच्या नोटा घेण्यासाठी गाडीतून बाहेर पडले. अभिषेक इकडे 10 रुपयांच्या नोटा उचलत असतानाच, गाडीच्या मागील सीटवर असलेली बॅग दुसऱ्या चोरट्याने लंपास केली. क्षणार्धात घडलेली ही घटना अभिषेक यांच्या लक्षातही आली नाही. काही वेळातच महेश परतल्यानंतर त्यांनी अभिषेक यांच्याकडे सीटवरील बॅगची विचारताच अभिषेक निरुत्तर झाले.
दरम्यान, अभिषेक यांनी घडला प्रकार गाडीचे मालक महेश चंद यांच्या कानावर घातला. त्यानंतर, लगेचच महेश यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेतले आहे.