नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संबंधित लिंकवर देशभरात छापेमारी केली आहे. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवल्याच्या आरोपांखाली एनआयएने ही छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांत एनआयएने या प्रकरणात एक डझनाहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पीएफआयशी संबंधित धागेदोरे सापडले होते. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी पीएफआयशी संबंधित १०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये पीएफआयचा प्रमुख परवेझ अहमद याच्याही एनआयएने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहेत.
एनआयएने उत्तर प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएला मोठ्या प्रमाणात पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्याआधारावर तपास यंत्रणांनी ही व्यापक कारवाई केली. १० हून अधिक राज्यांमध्ये ईडी, एनआयए आणि पोलिसांनी १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. पीएफआयशी संबंधित लोकांच्या प्रशिक्षणाच्या हालचाली, टेरर फंडिंग आणि लोकांना संघटनेशी जोडण्याविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
दिल्लीतील शाहीन बाग आणि गाझीपूर येथून पीएफआयशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय लखनौमधील इंदिरानगर येथूनही दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनीही राज्यातून पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, एनआयएच्या कारवाईविरोधात पीएफआयने प्रतिक्रिया दिली असून, संघटनेचे सरचिटणीस अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, फॅसिस्ट सरकारकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एजन्सींचा वापर केला जात आहे. सरकारकडून करण्यात येत असलेल्य अत्याचारांचं ताजं उदाहरण रात्री पाहायला मिळालं. केंद्रीय यंत्रणांनी लोकप्रिय नेत्यांच्या घरावर छापेमारी केली. विरोधी आवाज दाबण्यासाठी फॅसिस्ट सरकारकडून करण्यात येत असलेल्या कृत्याचा विरोध करा.