लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निती आयोगाच्या ९ व्या बैठकीला देशातील १० राज्यांनी दांडी मारली. त्यांचा कोणताही प्रतिनिधी बैठकीला हजर राहिला नाही. २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी बैठकीत सहभाग घेतला.नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि पुदुचेरी या राज्यांकडून कोणीही बैठकीला उपस्थित राहिले नाही.
माइक बंद केला, मला बोलूच दिले नाही : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शनिवारी निती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. विरोधकांच्या वतीने एकमेव प्रतिनिधी असतानाही माझे भाषण सुरू असताना माझा माइक बंद करण्यात आला, असा आरोप ममता यांनी केला आहे.
नितीश हेही अनुपस्थित
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही बैठकीला दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा बैठकीला हजर होते. यावरून आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.
सरकारने आरोप फेटाळले
सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती. ममता यांची भाषणाची वेळ भोजनानंतर होती. त्यांना लवकर कोलकात्याला जायचे होते म्हणून विनंतीवरून त्यांना ७ व्या क्रमांकावर बोलू देण्यात आले.