ऑनलाइन लोकमत
छत्तीसगड, दि. 4 - सुकमा नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी दहा संशयित नक्षलींना अटक करण्यात आलं आहे. सीआरपीएफ जवान आणि पोलिसांनी मिळून केलेल्या संयुक्त कारवाईत ही अटकेची कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या नक्षलींमधील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 25 जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले होते.
नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले.
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
CRPF and Chhattisgarh Police apprehended four suspected naxals in possible connection with Sukma naxal attack; 1 among them is a juvenile— ANI (@ANI_news) May 4, 2017
पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी १२ वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती, असे राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना आपली ढाल बनवत जवानांवर हल्ला केला. गावकऱ्यांच्या घरात घुसून त्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर फायरिंग केलं. सकाळी जवळपास 8.30 वाजता सीआरपीएफची 74 वी बटालियन जवानांसहीत दुर्गापाल कॅम्पहून रवाना झाली. चिंतागुफाजवळ पोहचल्यानंतर हे जवान दोन गटांत विभागले. त्यांच्यावर रस्ते निर्माण प्रोजेक्टसाठी कॉम्बिंगचं काम सोपवण्यात आलं होतं. तेव्हाच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना या ठिकाणाची माहिती आणण्यासाठी पाठवलं. जवानांच्या ठिकाणाची माहिती समजल्यानंतर नक्षलवाद्यांनी 11.30 च्या सुमारास चिंतागुफा - बुर्कापाल - भेजी भागाजवळ छोट्या छोट्या गटांत विभागलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.