नितीन अग्रवाल, नवी दिल्ली‘स्किल इंडिया’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या देशभरातील १० हजार महाविद्यालयांना यात सहभागी करून घेण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. त्यानुसार स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी सुयोग्य असे रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) संलग्न १० हजार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, या योजनेची आखणी बरेच दिवसांपासून सुरू होती. मात्र आता सर्व महाविद्यालयांना कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे औपचारिक निर्देश देण्यात आले आहेत.डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, यानुसार महाविद्यालयांनी स्थानिक गरजांनुसार सर्व वयोगटांसाठी अभ्यासक्रम सुरू करायचे आहेत. सध्या नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांना नवे व प्रगत कौशल्य आत्मसात करणे शक्य व्हावे यासाठी हे अभ्यासक्रम सकाळी आणि संध्याकाळी असे दोन पाळ्यांमध्ये चालतील. हे अभ्यासक्रम एक ते सहा महिने अशा छोट्या कालावधीचे असतील व ते पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासोबत एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे प्रमाणपत्रही दिले जाईल.
१० हजार कॉलेजांत होणार ‘कौशल्य विकास’
By admin | Published: December 28, 2015 4:20 AM