ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 01 - सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या 10 हजार भारतीयांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. तसंच सर्व भारतीयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे, जेणेकरुन कोणाची उपासमार होऊ नये अशी माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली आहे. दोन्ही सभागृहात सुषमा स्वराज यांनी निवेदन दिले. व्ही के सिंग स्वत: याची पाहणी करणार असून तेदेखील सौदी अरेबियाला जाणार आहेत असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे.
सौदी अरेबियात अडकलेल्या भारतीयांसंबधी दोन्ही सभागृहात सदस्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. भारतीय दूतावासाने पाच कॅम्प उभारले असून, आपल्याला प्रत्येक तासाची माहिती मिळत असल्याचं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं. एकही भारतीय उपाशी राहणार नाही, याची खात्री मी देते. आम्ही सर्वांना परत भारतात घेऊन येऊ असा विश्वास सुषमा स्वराज यांनी यावेळी व्यक्त केला.
सौदी अरेबियामधील परराष्ट्र आणि कामगार कार्यालयांच्या भारतीय सरकार संपर्कात आहे. अचानक नोक-या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये १० हजारहून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत आहेत. आर्थिक चणचणीमुळे हजारो कामगारांना उपाशीपोटी रहावे लागत आहे. केंद्र सरकारने आखाती देशांमधील आपल्या दूतावासांना या बेरोजगार कामगारांना अन्य मदतीबरोबर अन्न-पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
सुषमा स्वराज यांनी सौदीमध्ये राहणा-या 30 लाख भारतीयांना या कठीण काळात आपल्या बंधु-भगिनीना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी टि्वटरवरुन दिली होती