ऑनलाइन लोकमत
बेंगळुर, दि. ३० - १०,००० विद्यार्थ्यांना अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी पाठवायला हवं त्यासाठी भारत व अमेरिका या दोन देशांनी या दोन देशांनी करार करायला हवा असं मत इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनीअरिंग आणि गणित या चार विषयांमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी पुढील ५० वर्षांमध्ये १० हजार भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठवण्याचा खर्च वर्षाला ५ अब्ज डॉलर येईल. परंतु हे विद्यार्थी भारताच्या विकासासाठी जे योगदान देतील त्या तुलनेत हा खर्च अत्यंत किरकोळ असेल असंही मूर्ती यांनी म्हटलं आहे.
या विद्यार्थ्यांना पीएचडी केल्यावर अमेरिकेत नोकरी करता येणार नाही आणि त्यांना नंतर किमान १० वर्षे भारतातच काम करावं लागेल, ही या करारातली पहिली अट असायला हवी असंही त्यांनी सांगितलं. याचा अमेरिकेलाही फायदा होईल कारण भारतीय विद्यार्थी तिथल्या शिक्षणतज्ज्ञांना मदत करतिल.
त्याचप्रमाणे भारताने अमेरिकेत शिकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना व्हिसा द्यायला हवा अशी मागणी मूर्ती यांनी केली आहे.
भारतामध्ये अन्य देशातल्या विद्यापीठांना प्रवेश देण्याची गरज मूर्ती यांनी व्यक्त केली असून या संदर्भात आपले दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. जर भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर विदेशी विद्यापीठांना भारताची कवाडं उघडून देणं अत्यावश्यक असल्याचं मूर्ती यांनी सांगितलं.