चेन्नई/तेनी : तमिळनाडुच्या कुरंगनी (जिल्हा तेनी) डोंगरांच्या जंगलात रविवारी लागलेल्या भीषण आगीत पायी प्रवासाला (ट्रेकिंग) निघालेले १0विद्यार्थी मृत्युमुखी पडले. मात्र ३० ट्रेकर्सची सुटका करण्यात यश आले. सरकारने मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली अली.तेनीच्या जिल्हाधिकारी एम. पल्लवी बलदेव सोमवारी म्हणाल्या की, चेन्नई, कोईमतूर आणि तिरूपूर येथील बहुसंख्य विद्यार्थी ट्रेकर्स रविवारी दुपारी लागलेल्या या आगीत अडकले. ट्रेकिंगला गेलेल्यांत २५ महिला व तीन मुले होती. मृतांमध्ये सात जण चेन्नईचे तर तीन जण तिरूपूरचे होते. मृतांची नावे शुभा, हेमलता, पुनिता, अकिला, अरुण, विपीन दिव्या, विवेक आणि तमिळसेल्वम अशी आहेत. हवाई दलाची हेलिकॉप्टर्स अडकलेल्या आणखी ट्रेकर्सचा शोध घेत आहेत.काही ट्रेकर्सनी आपल्या मोबाइल फोनवरून नातेवाईकांना आगीची माहिती देताच, नातेवाईकांनी ती पोलिसांना कळवली. सायंकाळी साडेपाच वाजता बचाव कार्य सुरू झाले. वनअधिकाºयांनी सांगितले की, ट्रेकर्सनी जीव वाचवण्यासाठी कोरड्या जागेत आश्रय घेतला. परंतु तेथील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला. तेथून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही ट्रेकर्स खड्ड्यात पडले.राज्याचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन म्हणाले की, पाच जण अतिगंभीर जखमी असून त्यांना तेनी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तर सहा जणांना मदुराई वैद्यकीय महाविद्यालयात आणि तीन जणांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण सोमवारी वार्ताहरांशी बोलताना भारतीय हवाईदलाने सर्व नऊ विद्यार्थ्यांचे मृतदेह आणल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
जंगलातील आगीत १० ट्रेकर्स मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 4:43 AM