नवी दिल्ली - बहीण-भावाचं नातंच खूप खास असतं. अनेकदा लहानवयात अनेकांवर जबाबदारीचं ओझं असतं. अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीच्या उपचारासाठी एक दहा वर्षीय चिमुकला धडपड करत आहे. हैदराबादचा 10 वर्षीय मुलगा त्याच्या 12 वर्षांच्या बहिणीच्या उपचारासाठी निधी उभारण्यात त्याच्या पालकांना मदत करत आहे. सय्यद अझीझ असं या मुलाचं नाव आहे. त्याच्या बहिणीला सकीना बेगमला दोन वर्षांपूर्वी ब्रेन कॅन्सरचे निदान झाले होते.
सकीना बेगमच्या उपचारासाठी खूप खर्च येत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सकीनाच्या उपचारांसाठी खर्च करणं खूप कठीण आहे. अझीझने आपल्या आई-वडिलांची मदत करायचं ठरवलं आणि आता तो आईसोबत पक्ष्यांचे अन्न विकत आहे. सकीनाची आई बिल्कस बेगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकीनाचा जीव वाचवण्यासाठी रेडिओथेरपी करावी लागेल, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यासाठी आम्हाला तेलंगणा सरकारकडून निधी प्राप्त झाला होता. मात्र, ती सर्व रक्कम तिच्या रेडिओथेरपीमध्ये संपली आहे. त्यामुळे आता तिच्या इतर वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची गरज आहे."
"आमच्याकडे असलेले सर्व पैसे आम्ही तिच्यावर खर्च केले आहेत. त्यामुळे तिच्या पुढच्या उपचारांसाठी आमच्या जवळ पैसे नसल्याने हे काम करून पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहोत. पक्ष्यांचे अन्न विकून मिळणारे पैसे औषधांच्या खर्चासाठी पुरेसे आहेत. पण त्याशिवाय एमआरआय, एक्स-रे आणि रक्ताच्या चाचण्यांसह इतर खर्च देखील आहेत. मुलीला वाचवण्यासाठी दानशूर लोकांनी पुढे येऊन मदत करावी" असं आवाहन देखील त्याने केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.