श्रीनगर : काश्मीरच्या खोऱ्यातून जीवाच्या भीतीने १९९0 साली पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांनी पुन्हा राज्यात परत यावे, यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना काश्मीर खोऱ्यात राहण्यासाठी सरकारने १00 एकर जमिनीचीही व्यवस्था केली आहे.काश्मीरमध्ये १0८९-९0 साली दहशतवादी कारवायांना उत आला होता. त्या काळात अनेक काश्मिरी पंडितांना त्रास देण्यात आला आणि काहींना हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे घाबरून हजारो कुटुंबे काश्मीरमधून पलायन करून अन्य राज्यांत राहायला गेली होती. मात्र त्यांची दिल्लीसह सर्व ठिकाणी अवस्था विस्थापितांसारखीच होती. या काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये परत यायचे आहे आणि राज्य सरकारचीही तशी इच्छा आहे. मात्र आपल्याला पुन्हा त्रास दिला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. आता मात्र राज्य सरकारनेच या पंडितांनी पुन्हा यावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्याच आठवड्यात पंडितांनी पुन्हा परत यावे, असे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला.त्यानंतर त्यांना काश्मीर खोऱ्यातच राहता यावे, यासाठी सरकारने १00 एकर जमीन पाहून ठेवली. ते आल्यास त्यांना तिथे राहता येईल. तसेच त्यांच्यापैकी अनेकांना तिथे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान सहा हजार काश्मिरी पंडित तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी मेहबुबा मुफ्ती सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या सरकारमधील भाजपाही पंडितांच्या पुनरागमनासाठी आग्रही आहे. याबाबत मेहबुबा मुफ्ती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचीही अनेकदा चर्चा झाली. (वृत्तसंस्था)
काश्मिरी पंडितांसाठी 100 एकर जमीन
By admin | Published: January 24, 2017 3:53 AM