जम्मू-काश्मीर, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानची सेना जवळपास दररोजच शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या सरकारनं राजौरी जिल्ह्यात 100 बंकर बनवण्याचं काम सुरू केलं आहे. सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि मोर्टारच्या हल्ल्यांपासून बचावासाठी हे बंकर बनवण्यात येत असून, या बंकर्समध्ये राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळच्या गावातील लोकांना वेळप्रसंगी हलवण्यात येणार आहे. नियंत्रण रेषेजवळच्या नौशेरा सेक्टरमध्ये हे 100 बंकर बनवण्यात येत आहेत, अशी माहिती राजौरीचे पोलीस उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी दिली आहे. ते म्हणाले, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमेपलिकडून गोळीबार आणि मोर्टारचा हल्ला झालाच, तर अशा प्रसंगी जवळपासच्या गावातील 1200-1500 लोक या बंकरमध्ये आश्रय घेऊ शकतात.राजौरीचे पोलीस उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी यांनी निर्माणाधीन बंकरचा आढावा घेतला आहे. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम या बंकरांच्या बांधकामावर नजर ठेवून आहे. चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबार आणि बॉम्बफेक झालेल्या ठिकाणांनाही भेट दिली आहे. जम्मू-काश्मीर सरकारनं 100 बंकर बनवत असल्याची माहिती राजौरीजवळच्या गावातील लोकांना दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या जवळपास 6121 बंकर्सची गरज असल्याचंही जम्मू-काश्मीर मान्य केलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधला 22 वर्षांपासूनचा हंडवाडा चौकातील बंकर हटवण्यात आला होता. या बंकरमध्ये एका छेडछाडीच्या प्रकरणामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षात तीन जणांचा मृत्यूही झाला होता. या छेडछाडीप्रकरणी एका व्यक्तीस अटकही करण्यात आली होती. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी हा बंकर हटवण्यासाठी आंदोलन छेडले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आल्यानं हे बंकर हटवण्यात आले होते. आंदोलनामुळे प्रशासनानं संचारबंदीही लागू केली होती. लष्करानं बंकर रिकामे केल्यानंतर स्थानिकांनी ते तोडून टाकले. श्रीनगरमधल्या लोकांनी बंकर हटवल्यामुळे मोठा जल्लोषही केला होता.जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षात जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. एकीकडे दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी आणि हल्ले करण्याचे सातत्याने प्रयत्न होत असतानाच लष्करही पूर्ण सामर्थ्याने त्यांना प्रत्युत्तर देत आहे. त्यातच दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार काश्मीरमध्ये वावर असलेल्या बड्या दहशतवाद्यांना पद्धतशीररीत्या टिपण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी बशीर लष्करी तसेच हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सब्जार अहमद भट्ट यांचाही ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.
राजौरीजवळच्या नियंत्रण रेषेवर जम्मू-काश्मीर सरकार बनवतंय 100 बंकर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 7:12 AM