ऑनलाइन लोकमत
उन्नाव, दि. १४ - उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथे गंगा नदी किनारी तब्बल १०० मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. मंगळवारी संध्याकाळी गावातील नदी किनारी हे मृतदेह आढळले असून स्थानिक प्रशासनाने हे मृतदेह पुरण्याचे काम हाती घेतले आहे.
मंगळवारी संध्याकाळी उन्नावमधील ग्रामस्थांनी स्थानिक सरकारी यंत्रणांना नदीत मृतदेह असल्याची माहिती दिली. यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असता तब्बल १०० हून अधिक मृतदेह नदी किनारी आल्याचे निदर्शनास आल्याचे स्थानिक सरकारी अधिका-यांनी सांगितले. 'गंगा नदीत दररोज किमान चार ते पाच मृतदेह टाकले जातात.उन्नाव येथे गंगी नदीतील पाण्याची पातळी कमी असल्याने या भागात वाहून आलेले मृतदेह अडकले. ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये' असे आवाहन उपजिल्हाधिका-यांनी केली आहे. तर भाजपाचे उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेेयी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करुनच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे अशी मागणी केली आहे.
गावात रोगराईचा धोका
गंगा नदीत वाहत आलेले अनेक मृतदेह उन्नाव येथील नदी किनारी आले होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गंगा प्रदुषण मुक्तीसाठी काम करणारे रामजी त्रिपाठी यांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केल्यावर प्रशासनाला जाग आली आणि मंगळवारी या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरु झाले असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मकर संक्रातीला उन्नाव येथे गंगा नदीमध्ये आंघोळ करण्याची परंपरा आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे गावात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.