नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 2024पर्यंत देशात वापरण्यात येणारे सर्वच डिझेल इंजिन हटवण्याची घोषणा केली आहे. तसेच रेल्वेच्या पूर्ण जाळ्याला वीजसदृश्य करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक रुळावरून इलेक्ट्रिक इंजिनची ट्रेन्स धावणार आहेत. आम्ही देशातील रेल्वेच्या जाळ्याचं वेगानं विद्युतीकरण करण्यासाठी विचार करत आहोत. आम्हाला आशा आहे की, 2024पर्यंत सर्वच ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनवर धावायला लागतील. जगातील भारताची पहिली अशी रेल्वे असेल ती पूर्णतः विजेवर चालणार आहे. तसेच 2030पर्यंत रेल्वे नेटवर्क हे कार्बन उत्सर्जनापासून मुक्त होणार असून, स्वच्छ ऊर्जा निर्माण करणार आहे, असंही पीयूष गोयल म्हणाले आहेत. भारताच्या या परियोजनेत ब्राझीलला सहभागी करून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रदूषणविरहित भविष्यासाठी रेल्वेचं विद्युतीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. येत्या तीन-चार वर्षांत पूर्ण रेल्वेचं विद्युतीकरण करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. जेणेकरून जगात पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जनापासून रेल्वे मुक्त होणार आहे. रेल्वे आपली गरज पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेचं उत्पादन करत आहे.सरकारनं जुन्या कोळसा संयंत्रावर चालणारी इंजिनं बंद करण्याचा घाट घातला असून, लवकरच विजेवर चालणारी इंजिनं रुळावरून धावणार आहेत. कोळशावर चालणाऱ्या इंजिनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या इंजिनामधून एवढं प्रदूषण होत नाही. केंद्रानं वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर दिला आहे.
''2024पर्यंत डिझेल इंजिनवर नव्हे, तर विजेवर चालणार 100 टक्के ट्रेन''
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 4:40 PM