मुंबई : अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून तब्बल १०० चार्टर विमाने दाखल होणार आहेत. नामवंत उद्योगपती, चित्रपट कलाकार आणि मान्यवर या विमानांनी उपस्थित राहणार आहेत. याखेरीज नियमित विमानाने या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमाने उतरून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे काही विमाने लखनौ, वाराणसी, पाटणा, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत अयोध्येतील महर्षी वाल्मीकी विमानतळ प्रशासनाकडे ५० पेक्षा जास्त चार्टर विमान मालकांची त्या दिवसासाठी परवानगी मागितल्याची माहिती आहे. ही संख्या वाढून १०० पर्यंत जाईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. अयोध्येकडे चार्टर विमानाने जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या मुंबईतील आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही वाढ२२ जानेवारीच्या साेहळ्यानंतर विमान कंपन्यांतर्फे अयोध्येतील फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत विविध विमान कंपन्यांच्या २२ ते २५ फेऱ्या तेथे होणार आहेत. केवळ विमानच नव्हे तर रेल्वे तिकिटांच्या बुकिंगमध्येदेखील ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती आहे, तर इंटरसिटी टॅक्सी बुकिंगमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.