Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लगबगीने वेग घेतला आहे. २२ तारीख जवळ येत आहे, तसे राजकारणही अधिक तापताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील ७ ते ८ हजार मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. केवळ देशात नाही तर परदेशातही राम मंदिर सोहळ्याची निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. ५५ देशातील सुमारे १०० नेत्यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यासह अनेक राजदूतही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
विश्व हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद म्हणाले की, २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद सदस्यांसह ५५ देशांच्या सुमारे १०० प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय आणि इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आणि प्रतिनिधींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
निमंत्रणे पाठवण्याची प्रक्रिया अखंडितपणे सुरू
या सोहळ्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही निमंत्रण मिळाले आहे. विहिंपने राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्याकडे वेळ मागितला आहे. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनाही निमंत्रणे पाठवली जाण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले. हा कार्यक्रम भाजपा आणि संघाचा असल्याचे जयराम रमेश यांनी निवेदनात म्हटले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, अशी कबुली अखिलेश यादव यांनी दिली. तसेच आमंत्रण मिळाले असले तरी या सोहळ्याला जाणार नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले. धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण केले जात आहे. त्याचा निषेध म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार, उद्धव ठाकरे, कपिल सिब्बल आणि ममता बॅनर्जी यांनीही या भव्य सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला.