नवी दिल्ली - राजस्थानमधील कोटा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जेके लोन रुग्णालयात केवळ एका महिन्यात 100 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांच्या झालेल्या मृत्यूमुळे राजकारण तापले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एका महिन्यात एवढ्या बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यांना काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसशासित राज्य राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात 100 हून अधिक बालक मृत्युमुखी पडले आहेत. हे वृत्त अत्यंत निंदणीय असून वाईट आहे. राज्यातील अशोक गेहलोत सरकारचे हे अपयश असून या घटनेतून गेहलोत सरकराची उदासिनता, असंवेदनशिलपणा आणि बेजबाबदारपणा दिसून येतो, असं त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
मायावती यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. प्रियंका गाधी उत्तर प्रदेशातील पीडितांच्या भेटीला जातात. त्यांनी आता राजस्थानमध्ये मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांची देखील भेट घ्यावी, असं मायावती यांनी म्हटले आहे.