Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लगबगीने वेग घेतला आहे. २२ तारीख जवळ येत आहे, तसे राजकारणही अधिक तापताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेत्या सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येच्या सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे. असे असताना मात्र काँग्रेसचे १०० नेते अयोध्येला जाण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कार्यक्रमात कोणताही बदल नाही, माझ्यासह राज्यातील विविध पक्षांचे नेते ठरल्यानुसार, १५ जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत. पवित्र शहर अयोध्या भेटीदरम्यान, पक्षाचे नेते शरयू नदीत स्नान करतील. नंतर राम मंदिर आणि हनुमानगढी मंदिरात प्रार्थना करतील. अजय राय यांनी सांगितले होते की, १५ जानेवारीला अयोध्येला जात आहे. आमचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी अविनाश पांडे आणि ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि पी.एल. पुनियाही अयोध्येला जाणार आहेत. सुमारे १०० काँग्रेस नेते तेथे जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने दिल्याचे समजते.
अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित, त्यात बदल नाही
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा अपूर्ण मंदिराच्या उद्घाटनामागील हेतू काय, अस सवाल काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता. काँग्रेस नेते अयोध्येला जाणार नाहीत, यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, २२ जानेवारीला होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा वेगळा आहे. आम्ही मकर संक्रांतीला जात आहोत. उत्तर प्रदेशचे राज्य प्रभारी अविनाश पांडे यांच्यासह सुमारे १०० काँग्रेस पदाधिकारी १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे यापूर्वीच ठरले होते. त्यात बदल केलेला नाही.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळण्यावरून मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेरी लावण्यावरून अखिलेश यादव यांनी काही विधाने केली होती. तसेच निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले होते. यानंतर मात्र आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, अशी कबुली अखिलेश यादव यांनी दिली. तसेच आमंत्रण मिळाले असले तरी या सोहळ्याला जाणार नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.