नवी दिल्ली : विदेशांतील भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर भारताची भूमिका मांडण्यासाठी दूरदर्शनची २४ तास वृत्तसेवा १०० देशांत उपलब्ध करून देण्याचा विचार माहिती आणि प्रसारण मंत्रालय करीत आहे.सध्या दूरदर्शन इंडिया प्रामुख्याने विदेशांत वेगवेगळे सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, चीन आणि संयुक्त अरब अमिरात याच देशांत २४ तास वृत्त आणि चालू घडामोडींवरील कार्यक्रम सादर केले जातात. अनेक देशांत २४ तास वृत्तसेवा विस्तारण्याचा मंत्रालय विचार करीत आहे. विशिष्ट देशात वृत्तसेवा सुरू करण्याचा निर्णय खर्चिकही असेल. त्यात दूरदर्शनच्या वाहिनीचे प्रक्षेपण करण्यासाठी स्थानिक केबलची सेवा घेणे तसेच त्या देशांत बातमीदाराच्या वास्तव्याची सोय करणे हा खर्च मोठा आहे.वाहिनी सुरू करताना देशाच्या एकूण लोकसंख्येतील भारतीयांचे प्रमाण, तेथून भारतात होत असलेली थेट गुंतवणूक व भारतातून तिकडे जाणारा पैसा, त्या देशातून येणारे पर्यटक या बाबींचा विचार होईल.हे असतील निकषसंबंधित देशाला पंतप्रधानांनी दिलेल्या भेटी, परराष्ट्र मंत्रालयाचा संयुक्त सचिव दर्जाचा अधिकारी तेथे आहे का आणि त्या देशाची जवळीक अनेकस्तरीय संस्थांशी आहे का याचा विचार होईल. चीन व इंग्लड यांचे सार्वजनिक प्रक्षेपण अनेक देशांत उपलब्ध असून भारताचा हा पुढाकार या दोन देशांच्या गटात त्याचा समावेश करील.
१०० देशांमध्ये २४ तास ‘डीडी न्यूज’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 1:36 AM