- नितीन अग्रवालनवी दिल्ली : भारताने १०० कोटी लसमात्रा देऊन मोठा टप्पा गाठला असला तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. लसीकरणाचा हा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन व दूरदृष्टीचा विजय आहे. लसीकरणामुळे आमची समूह प्रतिकारशक्ती वाढली आहे, असे निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘७५ टक्के प्रौढ व्यक्तींना कमीत कमी एक, तर ३० टक्के लोकांना दुसरी मात्रा दिली गेली आहे. २५ टक्के लोकांना अजून एकही मात्रा दिली गेलेली नाही.’लसीकरणात कोणती आव्हाने आहेत, असे विचारल्यावर पॉल यांनी प्रारंभी भ्रम आणि ठरवून विरोधात केलेला प्रचार होता, असे म्हटले. लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्यावर जनतेत आत्मविश्वास वाढला. दुसरे आव्हान लस पुरवठ्याचे होते. आता दरमहा कोव्हॅक्सिनचे पाच कोटी आणि कोविशिल्डच्या २२ कोटी मात्रा मिळत आहेत. कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी कधी मिळेल, या प्रश्नावर त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी ‘डब्ल्यूएचओ’ची बैठक होणार असून मंजुरी मिळेल, अशी आशा असल्याचे म्हटले. मुलांच्या लसीकरणासाठी आमच्याकडे जाइकोव-डी (१२-१८ वर्षांच्या मुलांसाठी) लस आहे. तिच्यावर अभ्यास सुरू आहे, असे ते म्हणाले. भारताने अनेक देशांना लसीसाठी शब्द दिला आहे, या प्रश्नावर पॉल म्हणाले, जेव्हा आमची गरज भागेल तेव्हा जगाच्याही गरजा भागवू. १०० कोटी लस मात्रा दिल्या. आता मास्कमधून कधी सुटका मिळेल, या प्रश्नावर पॉल यांनी सध्या तरी त्यातून सुटका नाही, असे स्पष्ट केले. मास्क गरजेचाचकोणी सोबत असताना मास्क वापरणे गरजेचे आहे. दोन मात्रांनंतरही काळजी घ्यावी लागेल. चूक केल्यास पश्चात्ताप होईल; कारण विषाणूने रूप बदलले तर जास्त संकट निर्माण होऊ शकते; म्हणून आम्हाला सावध राहावे लागेल. काही महिने जाऊ द्या; कारण त्यानंतर एक नवी पहाट होणार आहे, असेही पॉल म्हणाले.हे तर अभूतपूर्व...भारत मोठा लस उत्पादक होता; परंतु, पहिल्यांदा लसीच्या विकासासाठीही परिचित झाला, असे सांगून पॉल म्हणाले, हे अभूतपूर्व आहे. कोव्हॅक्सिन पूर्णपणे भारताची लस आहे. दुसरी एमआरएनए लस, डीएनए लस भारतातच विकसित झाली. नेजल लसही भारतात बनेल. याशिवाय कोविशिल्ड, स्पुतनिक आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लसही भारतात बनत आहे.
Corona Vaccination: १०० कोटी डोस: देशाच्या आत्मनिर्भरतेचा विजय- डॉ. व्ही. के. पॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:48 AM