नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. विरोधक त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आटापिटा करत आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या एकजुटीची खिल्ली उडवली होती. त्याला राहुल यांनी उत्तर दिलं. देशाच्या जनतेची मोदी सरकारपासून 100 दिवसांत सुटका होईल, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं. शनिवारी कोलकात्यामध्ये विरोधकांची महारॅली होती. यामध्ये देशभरातील 18 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. विरोधकांच्या या रॅलीची मोदींनी खिल्ली उडवली. 'स्वत:च्या अस्तित्वासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व पक्ष बचाव, बचाव ओरडत आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या एकीला चिमटा काढला. मोदींच्या या विधानाला राहुल यांनी उत्तर दिलं. 'महामहिम, मदतीची याचना देशातील लाखो बेरोजगार तरुण, संकटग्रस्त शेतकरी, वंचित दलित आणि आदिवासी, त्रस्त अल्पसंख्यांक, उद्ध्वस्त झालेले व्यापारी करत आहेत. ते तुमच्या अत्याचार आणि अक्षमतेपासून मुक्त होण्यासाठी मदतीचं आवाहन करत आहेत. ही मंडळी 100 दिवसांमध्ये मुक्त होतील,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मोदी सरकारपासून शंभर दिवसात सर्वसामान्यांची सुटका होईल- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 9:27 AM