चंदीगड- वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे हरियाणाचे मंत्री अनिल विज त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चे आले आहे. कुठल्याही पक्षाचं नाव न घेता अनिल विज यांनी वादग्रस्त ट्विट केलं आहे. 100 कुत्रे मिळूनही एका वाघाचा सामना करू शकत नाहीत. गुजरात निवडणुकीत भाजपाचाच विजय होणार, असं ट्विट अनिल विज यांनी केलं आहे.
हरियाणाचे मंत्री अनिज विज यांनी या ट्विटमध्ये कुठल्याही पक्षाचं नाव लिहिलं नाही. पण अनिज विज यांचा निशाणा काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांकडे होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गुजरात निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारे काँग्रेसकडून हार्दिक पटेल आणि इतर पाटीदार नेत्यांबरोबर हातमिळवणीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यालाच लक्ष करत अनिल विज यांनी ट्विट केल्याचं बोललं जात आहे.
अनिज विज यांनी तिखट शब्दात टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशा प्रकारची विधानं आणि ट्विट केले आहे. नुकतंच अनिल विज यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली होती. एका कार्यकर्त्याने सांगितलं की , राहुल गांधींनी ज्या प्लेटमध्ये नाश्ता दिला होता, त्याच प्लेटमध्ये त्यांनी त्यांच्या कुत्र्याला पण नाश्ता दिला. ते (राहुल गांधी) काँग्रेस कार्यकर्ते आणि कुत्र्यांना समान नजरेने पाहतात, ही चांगली गोष्ट आहे, अशी टीका त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदार होणार आहे. तर हिमाचल प्रदेशसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल.