नवी दिल्ली : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फायली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सार्वजनिक केल्या. या दस्तावेजांमुळे नेताजींच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.बोस यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त येथील भारतीय अभिलेखागारात आयोजित समारंभात पंतप्रधानांनी कळ दाबून या डिजिटल फायली सार्वजनिक केल्या. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्य, केंद्रीय मंत्रीद्वय महेश शर्मा आणि बाबुल सुप्रियो उपस्थित होते. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी नंतर राष्ट्रीय अभिलेखागारात जवळपास अर्धा तास हे दस्तावेज बघितले. बोस कुटुंबीयांशीही पंतप्रधानांनी हितगूज केले. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात नेताजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी सरकार नेताजींशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स सार्वजनिक करेल, अशी घोषणा त्यांनी केली होती. कार्यक्रमाला उपस्थित नेताजींचे कुटुंबीय यावेळी भावुक झाले होते. पंतप्रधानांसमक्ष त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डिजिटल फायली उपलब्धनेताजींशी संबंधित १०० फायली (डिटिजल कॉपी) netajipapers.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत आणि यापुढे प्रत्येक महिन्यात २५ फायलींची एक डिजिटल कॉपी सार्वजनिक केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या पावलाचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. देशातील पारदर्शकतेचा पुरस्कार करणारा हा दिवस आहे.- चंद्रकुमार बोस, बोस कुटुंबाचे सदस्य व प्रवक्तेनेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रनेता घोषित केले जावे. त्यांच्या रहस्यमयरीत्या बेपत्ता होण्यामागील सत्य जाणून घेण्याचा अधिकार या देशातील जनतेला आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्याशी संबंधित आमच्याकडील ६४ फायली गेल्या सप्टेंबरमध्ये खुल्या केल्या होत्या.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगालमोदी सरकार काँग्रेसला बदनाम करण्यासाठी नेताजींच्या आड षड्यंत्र रचत आहे. काही निवडका फाईल्स सार्वजनिक करण्यास काँग्रेसचा कधीही पाठिंबा नव्हता. त्यामुळेच नेताजींशी संबंधित प्रत्येक फाईल खुली व्हायला हवी.- आनंद शर्मा, काँग्रेस नेते