कोटा - राजस्थानमधील कोटा येथील जेके. लोन रुग्णालयात सातत्याने बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये 9 अजून मुलांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे डिसेंबरपासून रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 100 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान या बालमृत्यूंवरून आता राजकारणालाही तोंड फुटले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने या मुद्द्यावरून राजस्थान सरकार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'एका महिन्यात 100 मुलांचा मृत्यू होणे ही प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करण्याइतपत सामान्य बाब नाही, असा संताप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. तर बीएसपी प्रमुख मायावती यांनीही बालमृत्यूवरून गहलोत सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये सुद्धा या रुग्णालयात 77 मुलांचा मृत्यू झाला होता. असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. ''30 डिसेंबर रोजी रुग्णालयात 4 मुलांचा मृत्यू झाला होता. तर 31 डिसेंबर रोजी 5 मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचा मृत्यू कमी वजनामुळे झाला आहे.''असे या रुग्णालयाचे सुपिरिटेंडेंट डॉ. सुरेश दुलारा यांनी सांगितले. मुलांचा मृत्यूनंतर भाजपाने गहलोत सरकारविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुथ अमित मालवीय यांनीही या प्रकारावरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. एका महिन्यात 100 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना कुणी साधा प्रश्नही विचारत नाही. कोटा हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी येऊ शकत नाहीत एवढ्या दूर नाही. तसेच ही घटना एवढी किरकोळ नाही मात्र काँग्रेस सरकारच्या बेफिकिरीकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका मालविय यांनी केली आहे.
राजस्थानमधील रुग्णालयात महिनाभरात 100 नवजात बालकांचा मृत्यू, राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 1:41 PM