लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. १०० किमी लांबीचा पूल पूर्ण झाला असून, २५० किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. देशातील ही पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी बुलेट ट्रेन प्रकल्पाची झलक दर्शविणारा व्हिडिओ शेअर केला. तसेच प्रकल्पाच्या प्रगतीशी संबंधित माहितीही दिली. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिलेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ४० मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्स गर्डर व सेगमेंट गर्डर जोडून १०० किमीचा मार्ग बांधण्यात आला आहे.
गुजरातमधील पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील पहिला ३५० मीटरचा पर्वतीय बोगदा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरतमध्ये ७० मीटर लांबीचा पहिला पोलादी पूल बांधण्यात आला आहे.
तीन तासांत ५०८ कि.मी.मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ५०८ किमीचे अंतर ३ तासात पूर्ण करेल. सध्या दुरांतोला दोन शहरांदरम्यानचे अंतर पार करण्यासाठी साडेपाच तास लागतात. या प्रकल्पाची किंमत १.०८ लाख कोटी रुपये आहे.