ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी 100 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या सीसीएस बैठकीनंतर नरेंद्र मोदी असे म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित होते.
ते म्हणाले, पाकव्याप्त सीमेजवळ दहशतवाद्यांचे लाँच पॅड असल्याची माहिती मिळाली असून, 100 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विभागानं गुप्तचर विभागाकडून ही माहिती मिळवून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे.
२९ सप्टेंबर रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक्सद्वारे अतिरेकी तळ उद्ध्वस्त करून ४० दहशतवाद्यांना खात्मा केला. त्यावेळी भारतीय लष्करानं जवळपास सात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी अतिरेकी भारतात घुसून दहशतवादी कृत्य करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पाकिस्तानने भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचा दावा नाकारला असला तरी भारताने फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.