केंद्र सरकारने मंगळवारी उज्ज्वला योजनेच्या एलपीजी सिलिंडरवरील किंमतीवर २०० रुपयांच्या सबसिडीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप होत आहे. असे असताना मोदी सरकारने रक्षाबंधनाचे गिफ्ट दिल्याचे समर्थक दावा करत आहेत. अशातच सपाचे नेते अखिलेश यादव यांनी दोन वाक्यांत टीका केली आहे.
उज्ज्वला योजनेतून ज्यांनी गॅस कनेक्शन घेतलेय त्यांना घरगुती गॅस सिलिंडरला २०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षीच स्पष्ट केले होते. याद्वारे आधीच २०० रुपये लाभ दिला जात होता. त्यात आणखी २०० रुपयांची वाढ झाली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अखिलेश यांनी एक ट्विट केले आहे. "100 महिने लूट… मग 200 रुपयांची सूट. भाजपच्या कॅलेंडरमध्ये ओणम आणि रक्षाबंधन हे दहा वर्षांतून एकदाच येतात. असं करूनही लोक कसे हसू शकतात. आता भाजपावाले धन्यवादची मालिकाही सुरु करती'', असा टोला हाणला आहे.
'जेव्हा मते कमी होऊ लागतात, तेव्हा निवडणुकीच्या भेटवस्तू वाटल्या जातात. साडेनऊ वर्षांपासून 400 रुपयांचा एलपीजी सिलिंडर 1100 रुपयांना विकून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केली आहे. याला भाजपचा 'इलेक्शन लॉलीपॉप' असे वर्णन करून आघाडीच्या भीतीचा हा परिणाम आहे, असे खर्गे म्हणाले आहेत.