मुंबई : झपाट्याने विकसित होणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. मात्र, ही मान्यता देताना ज्या कंपन्या ‘मार्केट प्लेस’ पद्धतीने व्यवहार करतात, त्यांनाच गुंतवणूक घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशनने ही मान्यता दिली आहे. सध्या ई-कॉमर्स कंपन्या ‘मार्केट प्लेस’ आणि ‘इन्व्हेन्ट्री’अशा दोन पद्धतीने काम करतात. यापैकी बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा आढावा घेऊन त्यानुसार त्या वस्तूंची विक्री करणारी पद्धती मार्केट प्लेस म्हणून परिचित आहे तर स्वत:कडे विशिष्ट माल साठवून त्यांची विक्री करणे याला इन्व्हेन्ट्री पद्धती म्हणून ओळखले जाते. भारतात सध्या कार्यरत असलेल्या बहुतांश परदेशी कंपन्या या मार्केट प्लेस पद्धतीने काम करतात तर भारतीय ई-कॉमर्स कंपन्या या इन्व्हेन्ट्री पद्धतीने काम करतात. त्यामुळे भारतातून कार्यरत परदेशी कंपन्यांना याचा जास्त फायदा होणार असून त्यांना १०० टक्क्यापर्यंत गुंतवणुकीचा टक्का वाढविता येणार आहे. (प्रतिनिधी)
ई-कॉमर्समध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता
By admin | Published: March 30, 2016 12:27 AM