नवी दिल्ली : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा (जेईई-मेन्स) निकाल सोमवारी जाहीर झाला असून, सहा विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवर कटारिया आणि रंजिम प्रबल दास (दोघेही दिल्ली), चंदीगडचा गुरमरीत सिंग, राजस्थानचा साकेत झा, महाराष्ट्राचा सिद्धांत मुखर्जी आणि गुजरातचा अनंत कृष्णा किदंबी यांनी या परीक्षेत १०० टक्के यश प्राप्त केले आहे.
परीक्षार्थींनी परीक्षेच्या प्रत्येक सत्रात मिळवलेले गुण १०० ते शून्य अशा वर्गात रूपांतरित करण्यात आले आहेत. एनटीएचे गुण आणि गुणांची टक्केवारी एकसारखी नाही, असे अधिकारी म्हणाले. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) २३ ते २६ फेब्रुवारी, २०२१ असे परीक्षेचे सत्र घेतले. ही परीक्षा ३३१ शहरांत ८०० पेक्षा जास्त केंद्रांवर घेण्यात आली. त्यात कोलंबो, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजाह, सिंगापूर आणि कुवेत येथील केंद्रांचाही समावेश होता. यावर्षी ६.५२ लाख उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यातील ९५ टक्क्यांनी बी. ई, बी. टेक परीक्षा दिली तर बी. आर्क, बी. प्लॅनिंगची परीक्षा ८१.२ टक्के विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा प्रथमच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओदिया, पंजाबी, तेलगू, उर्दू, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश भाषेत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवता यावेत, यासाठी यावर्षीपासून वर्षातून चार वेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचा पुढील टप्पा हा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होईल.
लॉकडाऊनमुळे बहरीनमध्ये परीक्षा घेण्यात आली नाही. एनटीए बहरीनमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पेपर टू ए (बी. आर्क), आणि टू बी (बी. प्लॅनिंग) घेण्यासाठी योजना तयार करील. मार्चमधील सत्र ज्यांनी निवडले ते पेपर वन (बी. ई., बी. टेक) इतर विद्यार्थ्यांसोबत मार्चमध्ये देऊ शकतील.