बंगळुरू : चंद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यात देशातील महिलाही आघाडीवर राहिल्या आहेत. विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर केवळ सहयोगी प्रकल्प संचालक के. कल्पना यांचे नाव समोर आले, मात्र १०० हून अधिक महिला शास्त्रज्ञांनी मिशन यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे.
चंद्रयान-२च्या प्रकल्प संचालक एम. वनिता आणि मिशन डायरेक्टर रितू करिधाल यांनीही चंद्रयान-३ टीमसाठी मोठी मदत केली. मोहिमेचे परीक्षण करणाऱ्या टीममध्ये रितू सहभागी होत्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा टीमला झाला. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या मते, प्रत्येक अंतराळ कार्यक्रम हा राष्ट्रीय मिशन असते.
काही निवडक शास्त्रज्ञांचा यामध्ये थेट सहभाग आहे. असे असले तरी हजारो शास्त्रज्ञ आणि अभियंते अप्रत्यक्ष यासाठी योगदान देतात. चंद्रयान-३ मध्ये शैक्षणिक, उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनीही सक्रिय भूमिका बजावली आहे.
संकल्पनेपासून ते यश मिळेपर्यंत...चंद्रयान-३ ची संकल्पना आणि रचना, प्रणाली आणि उपप्रणालींच्या विविध चाचण्या आणि मिशनच्या अंमलबजावणीत महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिला शास्त्रज्ञ अजूनही मोहिमेत व्यस्त असून, त्या यामध्ये योगदान देत आहेत.
सेन्सर्सच्या विकासातही पुढे...नेव्हिगेशन, कंट्रोल आणि सिम्युलेशनची जबाबदारीही महिलांनी पार पाडली. लेझर डॉप्लर व्हेलॉसिटी मीटर, लेझर अल्टिमीटर आणि लेझर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा यासारख्या महत्त्वपूर्ण सेन्सर्सच्या विकास आणि पुरवठ्यामध्ये देखील महिलांनी योगदान दिले.
लीडर नव्हे टीम मोठी...- संघटित आणि सामूहिक प्रयत्नाने काम करणाऱ्या टीमने चंद्रयान-३ चे यश सुनिश्चित केले. हीच इस्रोची संस्कृती आहे. येथे प्रत्येकजण खुल्या मनाने आहे ते काम स्वीकारतो. पदाचे महत्त्व लक्षात न घेता तपशीलवार चर्चा, प्रस्ताव पूर्ण केल्याशिवाय चर्चा पुढे जात नाही.
- टीमचा कोणताही सदस्य (टीमचा नेताही) टीमपेक्षा मोठा असू शकत नाही. टीम लीडरला सर्व विषयांमध्ये मास्टर असण्याची गरज नाही, परंतु तो टीममधील प्रत्येक सदस्याकडून सर्वोत्तम योगदानाची खात्री देतो, असे इस्रोने म्हटले आहे.