नवी दिल्ली : भारत ३०० कोटी रुपये खर्चून इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्ब तातडीने खरेदी करणार आहे. तसा करार दोन्ही देशात नुकताच झाला. याच स्पाइस बॉम्बचा मारा करून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानातल्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते.
हे बॉम्ब स्पाइस-२००० जातीच्या बॉम्बची अत्याधुनिक आवृत्ती असणार आहेत. या बॉम्बच्या माऱ्यामुळे शत्रूच्या इमारती तसेच बंकरचे एका क्षणात प्रचंड नुकसान होते. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्ब तीन महिन्यांच्या आत भारताला पुरविले जातील.
भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० लढाऊ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये दहशतवादी तळ असलेल्या इमारतींवर स्पाइस-२००० बॉम्बनी हल्ला चढविला. या बॉम्बनी त्या इमारतींचे क्राँक्रिटचे छत भेदले व आतील सर्व गोष्टींचा विध्वंस केला. मात्र इमारतीच्या ढाचा मात्र आहे त्या स्थितीतच राहिला. हेच या बॉम्बचे वैशिष्ट्य आहे. स्पाइस बॉम्बच्या अत्याधुनिक आवृत्तीच्या माºयाने शत्रूची कोणतीही इमारत वा बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त होते.