ऑनलाइन लोकमत
काग्गनहल्ली (कर्नाटक), दि. ५ - शाळेत मध्यान्ह भोजनासाठी दलित समाजातील महिलेला स्वयंपाकी म्हणून ठेवल्याने तब्बल १०० मुलांनी शाळा सोडल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आला आहे. गावात १ ली ते ७ वीत गेल्यावर्षी ११८ मुलं होती, आता फक्त १८ मुलंच शाळेत शिक्षण घेत असून संबंधीत महिलेने मध्यान्ह भोजन बनवले नाही तरच आम्ही मुलांना शाळेत पाठवू अशी अटच या मुलांच्या पालकांनी शाळा प्रशासनाला घातली आहे.
कर्नाटकमधील कागनहल्ली येथे सरकारी प्राथमिक शाळा असून या शाळेत राधम्मा यांची स्वयंपाकी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राधम्मा या दलित समाजातील असल्याने शाळेतील १०० मुलांनी गेल्या वर्षभरात शाळेतून नाव कमी केले आहे. राधम्मा या दलित असून त्यांच्या हातचे जेवण नको असे या मुलांच्या पालकांची भूमिका होती. तर उर्वरित १८ मुलांच्या पालकांनीही शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली खरी पण आता राधम्मा जेवण बनवणार नाही अशी अट घातली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. गावातील राजकारणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यास आम्हालाच दमदाटी केली जाते असे या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.