नवी दिल्ली - प्राप्तीकर विभागाने गुजरातच्या रिअल इस्टेट आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या समभाव समुहाचा 1000 कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला आहे. या समुहाच्या 20 ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर, ही बाब उघड झाली आहे. समभाव समुह हा गुजरातमधील मोठा आणि प्रतिष्ठित उद्योग समुह आहे.
रिअल इस्टेटमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि स्वस्त घरांचे समुहांचे प्रकल्प आहेत. व्हीटीव्ही न्यूज, समभाव मेट्रो नावाचे सायंदैनिक आणि टॉप रेडिओ समुहही या ग्रुपकडून चालविण्यात येतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार समभाव समुहाच्या ठिकाणांवर दोन दिवसांपूर्वी छापे टाकण्यात आले होते. त्यामध्ये, 1000 कोटी रुपयांचा बेहिशोबी व्यवहार आढळून आला आहे. या छाप्यात काही संवेदनशील कागदोपत्री पुरावेही आढळले आहेत.
खोट्या नावांवर मालमत्ता
स्थावर मालमत्ता आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये 350 कोटी ऑनमनी म्हणून घेतल्याचे पुरावे असून अनेक मालमत्ता या खोट्या नावांवर असल्याचे आढळून आल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. किरण वडोदरिया आणि मनोज वडोदरिया हे समभाव समुहाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचे वडिल भूपत वडोदरिया हे गुजरात सरकारमध्ये माहिती संचालक होते. दरम्यान, आज केलेल्या कारवाईमध्ये 500 कोटी रुपयांहून अधिक रोख रकमेची बेहिशोबी देवाणघेवाण पकडल्याचा दावा विभागाने केला आहे.
न्यूजक्लिक आणि न्यूजलाँड्रीचीही चौकशी
समभाव समुहानंतर प्राप्तीकर खात्याने दिल्लीत न्यूजक्लिक आणि न्यूजलाँड्री या डिजिटल माध्यम संस्थांच्या कार्यालयातही चौकशी केली आहे. त्यांचे आर्थिक व्यवहार कंपनीने तपासले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रींगच्या माध्यमातून न्यूजक्लिकच्या कार्यालयाची ईडीने झडती घेतली होती.