'आप'लं सरकार येताच महिलांना दरमहा 1000, तर बेरोजगारांना 5 हजार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 10:07 AM2021-12-15T10:07:52+5:302021-12-15T10:08:18+5:30
उत्तराखंडमधील कुटुंबात आई, बहिणी आणि मुलगी असेल तर प्रत्येकाच्या खात्यात 1 हजार रुपये महिना जमा होईल. येथील महिलांना संबोधित करताना केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली
काशीपूर - आगामी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. आम आदमी पक्षाने उत्तराखंड आणि पंजाबमध्ये निवडणुकांसाठी जोर धरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काशीपूर येथे आयोजित कार्यक्रमात आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली. उत्तराखंडमध्ये 'आप'लं सरकार आल्यास महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले.
उत्तराखंडमधील कुटुंबात आई, बहिणी आणि मुलगी असेल तर प्रत्येकाच्या खात्यात 1 हजार रुपये महिना जमा होईल. येथील महिलांना संबोधित करताना केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यानंतर, काशीपूर येथील जनसभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी बेरोजगार युवकांनाही मानधन भत्ता देण्यात येईल, असे सांगितले. जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहून ते केवळ उत्तराखंडचे सुपुत्र नव्हते, तर देशाचे वीरपुत्र होते. मी बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर सर्वच शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत केजरीवाल यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
उत्तराखंड बदलाव चाहता है जिसे लेकर काशीपुर की जनता भी उत्साहित है | जनसभा LIVE https://t.co/rXHVgBGtOQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 14, 2021
मी येथे राजकारण करायला आलो नाही, कर्नला कोठियाल हेही राजकारण करत नाही. आम्ही फक्त काम करतो, आपने दिल्लीत काम करुन दाखवलंय, तर कोठियाल यांनीही केदारनाथ पुनर्निर्माणचं काम करुन दाखवल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं. 10 वर्षे काँग्रेसने आणि 10 वर्षे भाजपने राज्यात राज्य केलं. मात्र, आजही येथील युवकांना नोकरी नाही, येथील तरुण आजही बेरोजगार आहे. दिल्लीत आम्ही 10 लाख युवकांना नोकरी दिली. त्याचप्रमाणे येथील युवकांनाही आम्ही नोकरी देऊ. जोपर्यंत युवकांना नोकरी मिळणार नाही, तोपर्यंत 5000 रुपये प्रतिमाह बेरोजगारी भत्ता देण्यात येईल, अशी घोषणाच केजरीवाल यांनी केली. दरम्यान, राज्यात आम आदमी पक्षाचं सरकार येताच 6 नवीन जिल्हे बनविण्यात येतील, असेही त्यांनी सांगतिले.