नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरला जागा करण्यासाठी ओडिशात तब्बल 1000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याबाबतच्या वृत्ताला वन विभागानेही दुजोरा दिला आहे. तर, हेलिपॅडच्या निर्मित्ती आणि सुरक्षेसाठी या झाडांची कत्तल करण्यात आल्याचं रेल्वे विभागाने स्पष्ट केल आहे. विशेष म्हणजे यासाठी वन विभागाची कुठलिही परवानगी घेण्यात आली नव्हती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंगळवारी ओडिशात सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मोदींचा हा दौरा वादात अडकला आहे. येथील बालंगर परिसरात होणारा त्यांचा दौरा लक्षात घेता तब्बल 1 हजार झाडे कापण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदींची सुरक्षा आणि हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी ही कत्तल करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त द हिंदू या वृत्तसंस्थेनं दिल आहे. या घटनेनंतर पर्यावरणवादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. सन 2016 मध्ये शहरी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रेल्वेच्या अधिकृत जागेतील 2.25 हेक्टर जागेत वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान मोदींचा दौरा लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी ही जागा रिकामी असल्याचे सांगत येथे हॅलिपॅडची निर्मित्ती करण्यासाठी परवानगी दिली. विशेष म्हणजे रेल्वे विभागाने हेलिपडच्या निर्मित्तीसाठी जागा दिली होती, पण वन विभागाने येथील झाडे कापण्याची परवानगी दिली नव्हती. दरम्यान, कापण्यात आलेल्या झाडांची उंची 7 फूट असून त्यांचे वाढीबाबत 90 टक्के खात्री देण्यात येत होती. वन विभागाने जवळपास 1000 ते 1200 झाडांची कत्तल करण्यात आल्याचे मान्य केलं आहे.